शनिवार, २० जून, २०१५

''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''

''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''
साधारणतः 20 की मी चा दाट
झाडाझुडपांनी वेढलेला घाट. आणि त्या घाटात वसलेल शेआठशे लोकसंखेचा तांडा. त्या विधानसभा मतदारसंघातील ते अगदी शेवटच नि दुर्गम भागातल ते गाव.घाट रस्त्याच्या मध्यातुनच तांड्यावर जायला फाटा फुटतो. बैलगाडी कशीबशी वाट काढू
शकेल अशा खडक,दगड धोंड्याच्या रस्त्यावरून आज मतांची भिक
मागण्यासाठी डस्टर,इनोव्हा,तवेरा,स्कार्पियो,क्र
ुजर, जिपा अशा गाड्यांचा ताफा तांड्यावर पोचला.
दिवसभर गुरं ढोरं चरुन आता माणसं आपापल्या दारि तांड्यावर परतत होती. गावच्या अर्धवट अवस्थेत उभ्या वेशीजवळ गाड्यांचा ताफा थांबला,उमेदवारासह कार्यकर्ते गाडीतुन
उतरले .लागलीच याचे-त्याचे पाय धरणीला सुरवात
झाली.डोक्यावर पदर घेतलेल्या बाया बापड्या कुडाच्या घराबाहेर तांदूळेतर
धान्य पाखडीत बसलेल्या, मोठ््या कुतुहलाने त्या उमेदवार कार्यकर्ते
त्यांच्या घोषणा, हात जोडण बघत होत्या लोक आपले पाय पडताहेत याच
त्यांना आश्चर्य वाटत असावं..काहि जणी चुल पेटवत तर
काही झाडझुड करत होत्या.
गावातील पुरुष मंडळी घाटातल्याच काही नापिक जमिनीवर दिवसभर घाम
गाळून जिवाचा आटापिटा करून
ति पिकवण्याची केवीलवाणी धडपड करून आले होते, थकुन भागून अंधार्या कुडात तर काही बाहेर अंधारात गप्पा मारत बसले. 
कोणी म्हातारे बाजेवर पहुडलेले तर
काही पारावरच्या गप्पांत दंग. मीडी,टॉप वर असलेल्या मुली चुंबळ डोक्यावर घेउन भांड्या भांड्याने
कुठल्या तरी झर्यातून पिण्याच पाणी वाहात होत्या.पोरं,युवक मंडळी चकाट्या पिटीत बसली तर
काही खेळण्यात दंग..... लाईटचा दूरपर्यंत खांब दिसत नव्हता.
आतापर्यंत बर्याच पक्षांच्या उमेदवारांची मतदान मागण्यासाठी इकडे चक्कर झालेली दिसत होती.
कारण, ज्या कुडाच्या घरावर
टिव्ही एंटीना नव्हता त्या कुडावर तर
राजकीय पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. ज्या चिमुकल्यांच्या हातात
उजळणी हवी होती, त्यांच्या हातात
''उमेदवारांचे हॅण्डआउट'' दिसत होती.ज्या तरुणांच्या हातात अधुनिक
तंञज्ञान हवे होते आणि स्वयंपूर्ण शिक्षण हवे होते, त्या तरुणांच्या हातात
आणि डोक्यात राजकीय पक्षांच्या टोप्या,झेंडे दिसत
होते.जी माय भाकरी थापत होती तिच्या गळ्यात अलंकारा एवजी पक्षाच्या निशाणीची माळ दिसत
होती . ''............... या निशाणीवरच बटन दाबा'' हे बिंबवण्यात उमेदवाराबरोबर कार्यकर्ते व्यस्त होते.
ज्यांनी उमेदवाराकडे विज, पाणी, रस्ते,शीक्षण
इ सुविधा मागायच्या सोडून ते त्याच कुटट् अंधारात
पैशाची मागणी करत होते,
आणि ''हो नक्की उद्याच पाठवून देतो फक्त लक्ष असु
द्या''''अशी मान डोलवून उमेदवार आपले मत पक्के करून पुढे सरकत
होते.ज्या युवकांच्या तोंडात राष्ट्रगीताची गरज होती त्यांच्या तोंडातून राजकीय पक्षांच्या घोषणा अव्याहत
पणे बाहेर पडत होत्या. तांड्यावरच्या त्या अंधारात अंधारात मोबाईल च्या टॉर्च च्या उजेडात उमेदवार,कार्यकर्ते मत माघत फिरत होते. माय
माऊली चिमणीच्या उजेडात भाकरी थापत बसलि होती.
एका उमेदवाराचा प्रसिद्धी प्रमुख(PRO) म्हणुन घेण्यात माझा मलाच संकोच वाटत होता.
उमेदवारासह गाड्यांचा ताफा परत फीरला, गाड्यांच्या उजेडात
आम्ही त्या घनदाट जंगलात तांड्यापासुन कशीबशी वाट काढली होती. मात्र ते तांडेकरी जगत असलेल्या रोजच्या स्थितीतून कशी वाट काढतील? त्यांना याची गरज वाटत
नसेल का? असंख्य विचार मनाभोवती फिरत होते.
निरागस तांडेकरी मात्र रोज रोज त्याच नेहमीच्या दिनचर्ये
प्रमाणे जगत होते,त्यांना बाहेरच्या जगाचा मागमुसही नव्हता.
लोकशाहीत वाढणार्या त्या तांड्याच जणु काही जगच वेगळ
होत. आपल्या सोयी,सुवीधांची,
हक्कांची जाणीवही त्यांना नव्हती.त्यांच्या याच अजाणते पणाचा फायदा गेली कित्येक वर्षे हे
पुढारी घेत आलेत....
घाट उतरत असताना राज्य सरकारची एक पाटी दिसली ''जंगली श्वापदांचा वावर,''कृपया सावध
राहा'' तांडेकर्यांच तिथल्या चिमुकल्यांच अप्रुप वाटल.
त्या दिवशीची बातमी न लिहिताच
मी विचारात पडलो. गेली 54 वर्षे महाराष्ट्रात असे अनेक
तांडे विकास उदयाच्या प्रतिक्षेत असतील. या मतदानानंतर
तरी पालटेल का ही तांड्यावरच्या प्रचाराची गोष्ट ???????
प्रिय ...,
मा बळीराजा(मराठवाडा)
                        गेल्या काही वर्षापासून आपला मराठवाडा दुष्काळी सावटात जगत आहे. यंदा नाही पण पुढल्या वर्षी तरी निसर्ग आपल्यावर 'किरपा करील' ह्या आशेने बळीराजा तू चातका प्रमाणे अच्छे दिनाची वाट पाहतो आहे… आज २०१५ उजाडले तरी तुझ्या आत्महत्त्या थांबतील असा समाधानकारक पाउस पडला नाही. परिणामी आत्म्हत्त्यांचा डोंगर अधिकाधिक उंच होत आहे म्हणूनच आज तुला अनवधानाने पत्र लिहितो आहे.
बळीराजा,सकाळी उठल्या नंतर शहरातला प्रत्येक व्यक्ती आधी दार उघडून पेपर हातात घेतो. चहाचा एक एक घोट रिचवत तो बातम्या वाचू लागतो,
कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्त्या,
मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर जाहीर करा-विरोधकांची मागणी,
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत,
बीड जिल्ह्यात ३ शेतकर्यानि मृत्यूला कवटाळले,
कापसाला योग्य हमीभाव द्यावा शेतकरी संघटनेची मागणी.
मराठवाड्यात चारा छावण्यांचे राजकारण............................................!
हे आणि असे कित्तेक मथळे तो वाचतो, मनाला वाईट वाटत, काही काळ हळहळतो ,शोक व्यक्त करतो तितक्यात चहा संपतो आणि तो पेपरची उघडलेली घडी बंद करून निघून जातो. हा त्याचा रोजचाच दिनक्रम आणि हो बळीराजा, हा त्याचाच नाही तर इथले राजकारणी,लेखक,कामगार,शासकीय अधिकारी -कर्मचारी, खत विक्रेते, आणि इथल्या धडधाकट तरुणांचाही असाच दिनक्रम.बळीराजा तू तिकडे जीवाच रान कर ओढ ताण करून शेती पिकव आम्हाला धान्य पुरव, आम्हाला परवडेल त्या भावात आम्ही धान्य घेऊ,मिळालेला गहू आई निवडून आणेल आम्ही त्या भाकऱ्या मज्जा मारत खाऊ. यामागचे कष्ट आम्हाला काय कळणार???तुला तुझा खर्च मिळाला काय आणि हमीभाव नाही काय ,कितीही आत्महत्त्या झाल्या आम्हाला कसलच सोयर सुतक नाही.हे आजच वास्तव.
एखाद्या खेड्यात एखाद्या शेतकरी बांधवाने आत्महत्त्या केली कि मग तिथला स्थानिक प्रतिनिधी वृत्तपत्र कार्यालयात बातमी पाठ्वतो,कार्यालयात संपादक ती बातमी रंगवून लावतो दुसर्या दिवशी सगळ जग ते वाचत आणि नंतर ते वृत्तपत्र रद्दीत जमा होत. गावचा तलाठी पंचनामा करतो काही दिवसांनी त्या शेतकऱ्याच्या घरी लाख दोन लाख रुपये येउन पडता. राजकारण्यांना पुळका येतो तेही काहीशी मदत करून जगभर मदतीचे फोटो उधळून likes मिळवतात. नंतर त्यांच्याकडे कोणीही फिरकत नाही. आजच्या या परिस्थितीला सरकारची इच्छाशक्ती कारणीभूत आहे, विर्रोधकांच आर्थकारण, तरुणांचा निष्काळजीपणा(आम्हाला सगळ आयत मिळतंय म्हणून),अधिकार्यांचा हुजुरेगीरीपणा,तुम्ही आम्ही सगळेच कारणीभूत आहोत.
बळीराजा, अस हे तुझ जगण्यातल वास्तव. मराठवाड्याच हे वास्तव तर आता अंगवळनीच पडलय, मराठवाड्याची जलधारा नाथसागरात पाण्याचा अभाव आहेच त्यात पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. कालच गावच्या आठवडी बाजारात गेलो होतो. चारा नसल्यामुळे पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेली गुर तू डोळ्यावर कातडी ओढून कमी भावात नाईलाजाने खाटकाच्या स्वाधीन करत होतास, हुंदके देत देत बैलाचा कासरा खाटिकाच्या हाती सोपवत होता. जानेवारीतच हि परिस्थी तर पुढे काय ???????हा आजचाच प्रश्न नव्हे हा मराठवाड्याला पडलेला कायमचाच प्रश्न आहे.
बळीराजा यावर कायमस्वरूपी तोडगा मात्र कोणीच काढत नाही. पण तू खचून जाऊ नकोस, निसर्ग नक्कीच तुझ्याबरोबर आहे. मराठवाडा नक्कीच दुष्काळ मुक्त होईल. आवघ्या जगाचा पोशिंदा तू लाख वादळे आली,लाख दुष्काळ आली तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहणारा आहेस लक्षात ठेव.
बळीराजा, हे पत्र वाचत असलेला माझा प्रत्येक मित्र तुझ्या सोबत आहे . आम्ही तरुण वर्ग नक्कीच पेट्रोल, वीज, पाण्याची बचत करू. झाडे लावू. सृष्टीचक्र पूर्ववत होण्यासाठी हातभार लावू झालच तर व्यापार्यांपेक्षा थेट तुझ्याकडूनच धान्य , भाजीपाला विकत घेऊ.
पण मायबापा तू आत्महत्त्या करू नकोस……. !
                                                                                             तुला नेहमीच त्रास देणारा
                                                                                                        एक युवक
                                                                                               मयुर गोपीचंद गव्हाणे.